कोल्हापूर : पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चांदोली, वारणा, उचंगी, सर्फनाला, धामणी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू राहिले.
कोडोली, पारगाव, माले येथील चांदोली प्रकल्पगस्तांना जमिनींचे वाटप गुरुवारी झाले. असे असले तरी इतर मागण्या प्रलंबित असल्याने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित आहेत. काही अंशी हे प्रश्न मार्गी लागले असले, तरी पूर्णपणे ते सोडविण्यास प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे.
याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. ५00 हून अधिक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले असून, यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे. आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, राजाराम पाटील, डी. के. बोडके यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत.