समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस/एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हा परिषदेने डिसेंबर २०२२पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती. पण जवळजवळ दोन वर्षे झाली तरीही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. सातत्याने त्रुटी काढल्या जातात. एक त्रुटी पूर्ण केल्यानंतर दुसरी सांगितली जाते. अंशदायी पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतू या प्रक्रियेमध्येही अनंत अडचणी येत असून याविरोधातच हे आंदोलन करण्यात येणार आहे.