कोल्हापूर : छोट्या व्यापाऱ्यांचे रक्त पिळणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांतर्फे शनिवारी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.नवी दिल्ली, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)यांच्या आदेशाप्रमाणे ई-कॉमर्स कंपनीच्या अनैतिक व्यापारास विरोध म्हणून संपूर्ण भारत देशभर निदर्शने करणे, ई-कॉमर्स कंपनीच्या पुतळ्याचे दहन करण्याचे जाहीर करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न व्यापारी संस्था यांचेतर्फे शनिवारी निदर्शने करण्यात आले.चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना खुला व्यापार करण्यासाठी काही निर्बंध घतले आहेत. त्या निर्बंधाना झुगारून सर्व ई-कॉमर्स कंपन्या अनैतिक पद्धतीने व्यापार करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम देशातील किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांवर होत आहे. कोरोना संकट असतानादेखील लॉकडाऊनमध्ये देशभरातील सर्व किरकोळ विक्रेत्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन संपूर्ण जनतेची सेवा करण्याचे काम केले.
देशामध्ये ७ ते ८ कोटी किरकोळ विक्रेते असून त्यांचे कुटूंब, कर्मचारी व कामगार अशी ३० कोटी जनता अवलंबून आहे. ते सर्वजन किरकोळ व्यापार डबघाईला आल्यास बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्सच्या अनैतिक व्यापारामुळे देशभरातील बऱ्याच किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद झाली आहेत.यावेळी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) संघटन सचिव ललित गांधी, चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक राहूल नष्टे, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, प्रकाश पुणेकर, संभाजी पोवार, संपत पाटील, अनिल धडाम, स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील व संदीप वीर. तसेच, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट), नवी दिल्ली यांचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य विजय नारायणपूरे, बबन महाजन, अतुल दोशी उपस्थित होते.