केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे केले असून इंधन दरवाढ, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदेही मोडीत काढले आहेत. आता तर राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षणही रद्द केले आहे. या सर्व मुद्यांविरोधात शनिवारी डाव्या, पुरोगामी संघटनांनी राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर येथील शाहू पुतळा परिसरात केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. घोषणाबाजीमुळे शाहू पुतळा परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात प्रताप होगाडे, गौस आत्तार, दत्ता माने, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, ए.बी. पाटील, आनंदराव चव्हाण, सदा मलाबादे, रामदास कोळी, हणमंत लोहार, सुनील बारवाडे, धोंडीबा कुंभार सहभागी झाले होते.
(फोटो ओळी)
इचलकरंजीत शेतकरी-कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत, इंधन दरवाढ रोखावी, यांसह विविध मागण्यांसाठी येथील डाव्या, पुरोगामी संघटनांच्यावतीने शाहू पुतळा चौकात निदर्शने केली.