लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : तुम्ही निवडलेले वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्य साधे-सरळ नाही. हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. नवसंशोधन, बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक अँड डेटा ॲनॅलेसिस या सध्याच्या आव्हानांमुळे आरोग्यसेवेवरील खर्च वाढत आहे. ही आव्हाने पेलून सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी बुधवारी येथे केले.
येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, तर कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
बस्तवडे (ता. कागल) येथील एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी.) पदवी, तर अभिनेता आर. माधवन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट्.) आणि हेरले (ता. हातकणंगले) येथील ८५ वर्षीय शाहीर, कवी कुंतिनाथ करके-पाटील यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट्.) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या समारंभात वैद्यकीय शिक्षणातील विविध शाखांमधील ३६१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
जगाच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सुविधेच्या मर्यादा असूनही कोरोना काळात देशात चांगली कामगिरी झाली. देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान नवपदवीधरांनी पेलावे. वैद्यकीय संशोधक, डॉक्टर, औषध निर्मिती करणाऱ्यांनी एकत्रित काम करून आरोग्यसेवा व्यापक करण्याची गरज असल्याचे माजी कुलगुरू डॉ. खोले यांनी सांगितले.