‘शायनिंग’, ‘धतिंग’ची कोल्हापुरात ओळख
कॅनडात आराम राहिल्यानंतर वडिलांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मला कोल्हापूरला पाठविले. थंड पाण्याने अंघोळ, नाष्टा करायला दीड किलोमीटर चालत जाणे, यामुळे कोल्हापूरमध्ये येणे मला शिक्षा वाटत होती. मात्र, जसा येथील लोकांमध्ये रमू लागलो, तसा जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलल्याचे अभिनेता आर. माधवन यांनी सांगितले. संवादाच्या पातळीवर अनेक नवीन गोष्टी शिकलो. त्यातून आयुष्याला दिशा मिळाली. ‘शायनिंग’, ‘धतिंग’ या शब्दांची ओळख कोल्हापूरमध्ये झाली. येथील माणसे सोन्याच्या हृदयाची आहेत. माझी पत्नी कोल्हापूरची असून तिच्यारूपाने देवी अंबाबाईचे माझ्याजवळ वास्तव्य असल्याचे माधवन यांनी सांगितले.
चौकट
माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण
शाहीर, कवी, लेखक म्हणून वयाच्या ८५ व्या वर्षीही अविरतपणे कार्यरत आहे. या कार्याचे खरे कौतुक डी. वाय. पाटील विद्यापीठाने आज केले असून, हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. ज्ञानसरोवरातील राजहंस असणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी देशाची आरोग्यसेवा करण्यासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो डॉक्टर घडविले असल्याचे कुंतिनाथ करके-पाटील यांनी सांगितले. त्यांनी विविध आठवणींना उजाळा देत जीवनप्रवास उलगडला.
डॉ. विजय खोले म्हणाले, नवपदवीधरांनो, शिकणे कधी सोडू नका. स्वत:ला अद्यावत ठेवा. वैद्यकीय उपचार ही कला आहे. त्यात नवतंत्रज्ञानाचा अवलंब करताना माणुसकी, काळजी करणे विसरू नका. तुम्ही आता फ्रंट लायनर योध्दे म्हणून लढताना जबाबदारीने कार्यरत राहा. भविष्यातील बायोमेडिसीनच्या युगात उपचार पध्दतीत वैयक्तिक दृष्टिकोन बाळगा, प्रयोग, संशोधन करा.
चौकट
सुवर्णपदक विजेत्यांचा गौरव
चेतन शर्मा, सायली मेस्त्री, कोमल पवार, सरवैय्या अदा, मोनिका नायर, संजना भागवत, प्रणव पाटील, ऐश्वर्या वर्मा, गुरुपाल सिंग या विद्यार्थ्यांना प्रमुख उपस्थितांच्याहस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभानंतर स्नातकांनी आपले पालक, मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी, सामुदायिक छायाचित्रे घेत आनंद व्यक्त केला.