येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, तर कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते. बस्तवडे (ता. कागल) येथील एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एससी) पदवी, तर अभिनेता आर. माधवन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) आणि हेरले (ता. हातकणंगले) येथील ८५ वर्षीय शाहीर, कवी कुंतिनाथ करके-पाटील यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उत्साही, शानदार वातावरणातील या समारंभात वैद्यकीय शिक्षणातील विविध शाखांमधील ३६१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
जगाच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सुविधेच्या मर्यादा असूनही कोरोना काळात देशात चांगली कामगिरी झाली. देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान नवपदवीधरांनी पेलावे. वैद्यकीय संशोधक, डॉक्टर, औषध निर्मिती करणाऱ्यांनी एकत्रित काम करून आरोग्यसेवा व्यापक करण्याची गरज असल्याचे माजी कुलगुरू डॉ. खोले यांनी सांगितले. उच्च ध्येय ठेवून आणि सातत्याने कार्यरत राहून ते साध्य करीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणक्षेत्रात उत्तुंग कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन दृढनिश्चयाने नवपदवीधरांनी कार्यरत राहावे. गोरगरिबांना आरोग्यसेवा देण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा. कोरोना काळातील कामगिरी पाहता डॉक्टर हे ‘विद्ववान योद्धा’ ठरल्याचे एअर मार्शल भोसले यांनी सांगितले. या कार्यक्रमास डॉ. एस. एच. पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, राजश्री काकडे, पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, दीक्षांत समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह सभागृहात आले. कुलपती डॉ. पाटील यांनी विद्यापीठाची वाटचाल मांडली. कुलगुरू डॉ. मुदगल यांनी अहवाल वाचन केले. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्नातकांच्या यादीचे वाचन केले.