शिरोळ : मौजे आगर (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत हद्दीतील गृहनिर्माण संस्था, सोसायटी, कॉलनी, वसाहतींना मूलभूत सुविधा मिळाव्यात, येथील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, गटारी बांधाव्यात, अन्यथा स्वतंत्र ग्रामपंचायतीला मंजुरी द्यावी, या मागणीसाठी आदिनाथ गौंडाजे यांनी मंगळवारी क्रांतिदिनादिवशी शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, आमदार उल्हास पाटील यांनी यासंदर्भात योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी हे उपोषण सोडले. शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आदिनाथ गौंडाजे यांनी दिवसभर उपोषण केले. त्यांच्यासोबत मगदूम सोसायटी, विनायक कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, वीज कामगार सोसायटी, पार्वती, मंगलमूर्ती, महावीर कॉलनीतील ग्रामस्थांनी उपोषणास पाठिंबा दिला. या सर्व नागरी वसाहतींचा आगर ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे, परंतु ग्रामपंचायतीकडून २४ वर्षांत सांडपाणी योजना, गटारी, आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरविल्या नाहीत. मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी वारंवार मागणी करूनसुद्धा दखल घेतली जात नाही. हा प्रश्न ग्रामपंचायत, पंचायत समिती शिरोळ आणि जिल्हा परिषदेकडे ढकलून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. आगर ग्रामपंचायत ही या नागरी वसाहतीपासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे या वसाहतीमधील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी अडचणीचे झाले आहे. ग्रामपंचायत या ठिकाणी विकासाच्या योजना राबविण्यासाठी असमर्थ ठरली आहे. तरी या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी, अशी मागणी उपोषणादरम्यान करण्यात आली. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आदिनाथ गौैंडाजे यांनी उपोषण सोडले. उपोषणस्थळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिलराव यादव, सभापती सुवर्णा अपराज, नीळकंठ फल्ले, असलम मुल्ला यांच्यासह विविध संघटना, पक्षांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या.अन्यथा नगरपंचायत कराआमदार उल्हास पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या भावना जाणून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी सुविधा देता येत नसतील तर स्वतंत्र नगरपंचायत करा, अशीही मागणी केली.
मौजे आगरच्या उपनगरांना चांगल्या सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2016 11:36 PM