जयसिंगपूर : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा सूक्ष्म पतपुरवठा (महिला बचत गट) अल्पसंख्याक समाजातील मान्यताप्राप्त बचत गटांनाही सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली.
अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबईच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाच्या अल्पसंख्याक समाजातील आर्थिक मागासलेल्या लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यांपैकीच गत महिन्यामध्ये या विभागाकडून सूक्ष्म पतपुरवठा योजना (महिला बचत गट योजना) सुरू करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. सूक्ष्म पतपुरवठा योजना (महिला बचत गट योजना) या योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान व ग्रामीण विकास यंत्रणा संस्थांमार्फत संलग्न असणाऱ्या महिला बचत गटांना कर्जाचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही बाब अल्पसंख्याक समाजातील मान्यताप्राप्त इतर महिला बचत गटांवर अन्यायकारक आहे. तसेच या योजनेचा लाभ अल्पसंख्याक समाजातील गरीब व होतकरू महिलांना होणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
फोटो - १५०७२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - मुंबई येथे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवेदन दिले.