सांगली : राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णांना पुरवठा करण्यात येणारा औषधसाठा जप्त करण्याची अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई पूर्ण झाली असली तरी, त्यांना आता शासकीय रुणालय व ठेकेदार यांच्यात काय करारनामा झाला होता, तो हवा आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी रुग्णालयाकडे करारनामा देण्याची मागणी केली आहे. तथापि रुग्णालय टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला तीन दिवसात करारनामा देण्याचा आदेश दिला आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांना मोफत उपचार असताना, औषधांसाठी शासकीय रुग्णालयात त्यांच्याकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी फॅमिली केअर अॅण्ड वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी केली होती. अन्न व औषध प्रशासनाने सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात एकाचवेळी स्वतंत्रपणे छापे टाकण्यास सुरुवात केली. या छाप्यात ८ लाख १५ हजारांची औषधे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेला औषधसाठा ताब्यात मिळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निरीक्षक जयश्री सौंदत्ती यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने तशी परवानगी दिली आहे. त्यानुसार हा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. पलूस येथील दीप मेडिकलला योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. यासाठी रुग्णालयाने त्यांना खोली उपलब्ध करुन दिली होती. या खोलीत कार्यालय करण्यात आले होते. औषध दुकानही थाटले आहे. मात्र औषधांचा साठा करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यासंदर्भात ठेकेदार व रुग्णालय यांच्यात करार झाला आहे. हा करार काय आहे, याची माहिती घेण्यासाठी निरीक्षक सांैदत्ती व नांगरे यांनी रुग्णालय प्रशासनास करारनामा देण्याची मागणी तीन दिवसांपूर्वी केली आहे. तथापि रुग्णालयाने अद्यापही करारनामा दिलेला नाही. त्यामुळे आता ठेकेदाराकडे करारनाम्याची मागणी केली आहे. येत्या तीन दिवसात करारनामा सादर करण्याचा आदेश त्याला देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)औषधांची बिले प्रशासनाकडे सादरफॅमिली केअर अॅण्ड वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी आज (गुरुवार) अन्न व औषध प्रशासनाकडे, ठेकेदाराने योजनेंतर्गत असलेल्या मोफत औषधांची विक्री केली असल्याचे पुरावे सादर केले आहेत. ठेकेदारासह त्याला मदत करणाऱ्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
औषध साठ्याचा करारनामा द्यावा
By admin | Published: July 24, 2014 11:22 PM