कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील फयेपैकी लिंगाडीच्या धनगर वाड्यावरील कविता व मंगल बाजारी या दोन बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान मंजूर करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मल्हार सेनेतर्फे सोमवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.मल्हारसेनेचे अध्यक्ष बबन रानगे व जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार शीतल मुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, लिंगाडीच्या धनगरवाड्यावर कोंडीबा बाजारी व पत्नी ठकुबाई बाजारी हे त्यांच्या कविता व मंगल या दोन्ही मुली व एका मुलासह धनगर वाड्यावर राहत होते. भूमिहीन असल्याने, पावसाळ्यात रोजगार मिळत नसल्याने भीक मागून कुटुंबाचा चरितार्थ ते चालवित होते; परंतु या पाचही जणांवर शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली.
यामध्ये दोघी बहिणींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही प्रेते जवळच दफन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील धनगरांच्या वाट्याला हालअपेष्टाच असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. ही घटना महसूलमंत्र्यांच्याच तालुक्यात घडते, हे दुर्दैवी आहे.शिष्टमंडळात राघु हजारे, छगन नांगरे, शहाजी सिद, बाबूराव बोडके, देवाप्पा बोडके, बबलू फाले, बाळासो दार्इंगडे, आण्णासो कोळेकर, विक्रम शिणगारे, आदींचा समावेश होता.