जयसिंगपूर : शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयासाठी जागा विनासारा, विनामहसूल उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
गेल्या ५० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे हा जयसिंगपूरवासीयांच्या प्रतिष्ठेबरोबर आत्मसन्मानाचा प्रश्न बनला आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावर जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सदरची जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असून जवळपास सव्वादोन कोटी रुपये रक्कम भरण्याबाबत शासनाने नगरपालिकेला कळविले आहे. ती विनामोबदला मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री थोरात यांनी दिल्याचे खासदार माने यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील उपस्थित होते.