कोल्हापूर : कणेरीमठ येथे २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी देशभरातून मान्यवर येणार आहेत, त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून पायाभूत सुविधा निर्माण करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. हा लोकोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची असून मनुष्यबळ, सोयीसुविधांपासून नियोजनापर्यंत शासनाच्या विविध विभागांचा यात सहभाग राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.मंत्रालयात झालेल्या लोकोत्सवाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे, सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक म्हणून काम करेल, यात विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील, असे सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यावरण संतुलनावर लोकोत्सव होत असून या माध्यमातून विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्र शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत माहिती देण्यात आली.प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी पूर्वतयारीबाबत सादरीकरण केले. सात दिवस ६५० एकर विस्तीर्ण जागेत होणाऱ्या या लोकोत्सवात २५ हून अधिक राज्य, ५० हून अधिक देशातील मान्यवर तसेच संस्था, विद्यापीठांचे कुलगुरू, साधू संत, विविध दालने असणार आहेत. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असा अंदाज आहे.