कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गेली कित्येक वर्षे टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप ही साधने अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवली जातात. पण हे आता शेतकऱ्यांकडे सर्रास उपलब्ध असल्याने त्याऐवजी सोलर कंदील द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. बुधवारी झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत सोलर साधने देण्याचा ठराव करण्यात आला. आता हा मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी असजारे, साधने पुरवली जातात. कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, मोटार पंप, इंजिन, ताडपदरी, टिकाव, खोरे, पाटी, बॅटरी पंप यासारख्या साधनांसाठी निधीची तरतूद केली जाते. वैयक्तिक लाभाच्या या योजनेसाठी साधारणपणे दरवर्षी पाच-सहा हजार लाभार्थी निवडले जातात. यावर्षीदेखील यासाठी तब्बल १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वाधिक मागणी असलेली कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, मोटर पंप याचे वाटप कायम ठेवून त्यातुलनेत आता फारशी गरज नसलेले व बाजारात सहज उपलब्ध असलेली साधने वगळून नवी साधने देता येतात का? याबाबत विचार सुरू होता. बुधवारी स्थायी समिती सभागृहात उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची बैठक झाली. यावेळी पाच हजार रुपये किमतीचे सोलर कंदील देता येतील का? याबाबत चर्चा होऊन अखेर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप यासाठीचे प्रत्येकी १० लाख याप्रमाणे ३० लाखांचा निधी सोलरकडे वळविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे ठरले. बैठकीला कल्पना चौगुले, गडहिंग्लज सभापती रूपाली कांबळे, करवीर सभापती मीनाक्षी पाटील, कृषीविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
चौकट ०१
लाभार्थ्यांना आवाहन
वैयक्तिक लाभाच्या योजनासाठीचे लाभार्थी निवडीची यादी तयार झाली असू्न, ती बुधवारी अंतिम मान्यतेनंतर तालुक्यात पाठवण्यात आली. लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी करून तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पावत्या जमा कराव्यात. त्यानंतर लगेचच डीबीटीने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.