कोडोली : कोडोली गावातील काही भागात प्रतिवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी लोकवस्तीत येऊन घरांचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान होत आहे. पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी गायरानातील जमीन देऊन पुनर्वसन करावे, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला पूरग्रस्तांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोडोली येथील कोळ्याची चिंच, लोहारवाडा व कुंभारवाडा या ठिकाणी प्रत्येक वर्षी ओढ्याच्या पुराचे पाणी तसेच वारणा नदीच्या पाण्याची फुगी मोठ्या प्रमाणात येते. यावर्षी मोठ्या प्रमाणात महापूर आल्याने येथील १५२ कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती, त्याच बरोबरच धान्य व प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऐन पावसाळ्यात या कुटुंबांना स्वत:चे घर सोडून स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे या कुटुंबांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पूरबाधित होणाऱ्या कुटुंबाच्या नुकसानाचा विचार करून गायरानमधील जागा कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी द्यावी, असे निवेदनात मागणी केली आहे. सरपंच मनिषा पाटील उपसरपंच निखिल पाटील, मोहन पाटील, प्रकाश पाटील, मोहन पाटील ,मानसिंग पाटील, प्रकाश हराळे, प्रशांत जमने, विलास पाटील, भगवान पोवार, उदय पाटील, ग्रामसेवक ए. वाय. कदम, विजय कोळी, योगेश स्वामी, आनंदा घाडगे, दीपक केकरे, तौफिक आंबी, राहुल पाटील, विलास पाटील यांच्यासह पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
कोडोली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:23 AM