शिवाजी विद्यापीठ (राजेंद्रनगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांची पालकमंत्री सतेज पाटील आणि सकल मराठा समाजातील समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आदींनी सोमवारी पाहणी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शनिवारी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत पुन्हा या जागांची पाहणी करून त्यातील एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून या चार जागांची तांत्रिक स्वरूपातील माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, अभ्यासक्रम, आदींद्वारे बळ देण्याचे काम केले जाणार आहे. विद्यार्थ्यांबाबतचे काम या संस्थेच्या उपकेंद्राअंतर्गत होणार आहे. त्याचा विचार करून शिवाजी विद्यापीठ अथवा राजाराम महाविद्यालय परिसरातील जागा या उपकेंद्रासाठी योग्य ठरणार आहे. त्यादृष्टीने शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
प्रतिक्रिया
पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रांताधिकारी यांच्याकडून पाहणी केलेल्या चारही जागांची तांत्रिक माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. त्याची माहिती पालकमंत्री पाटील यांना दिली जाईल. शनिवारी पुन्हा पाहणी करून जागा निश्चित झाल्यानंतर त्याबाबत शासनाकडे मागणी केली जाईल.
-अशोक पाटील, निबंधक, सारथी संस्था.
प्रतिक्रिया
सारथी उपकेंद्राचे काम विद्यार्थ्यांशी संबंधित असल्याने त्यासाठी शिवाजी विद्यापीठ किंवा राजाराम महाविद्यालयातील जागा मिळणे आवश्यक आहे. आम्ही या जागांबाबत आग्रही आहोत. त्यामुळे अन्य दोन जागांचा शासनाने विचार करू नये.
-वसंतराव मुळीक, समन्वयक, सकल मराठा समाज.