कोल्हापूर : शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षण, छाननी झाल्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुराचा फटका महापालिका हद्दीतील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. शहर परिसरात अनेकांची राहती घरे पडली आहेत. झोपड्या पडल्या आहेत. त्यांना राज्य शासनातर्फे तत्काळ मदत दिली जात आहे. परंतु ज्यांची राहती घरे, झोपड्या पूर्णत: पडलेली आहेत, अशांना महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधून देणार आहे. त्याकरिता शहरातील दोन जागाही निश्चित केल्या आहेत.सध्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या घरांचे, झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू असून, माहिती संकलित केली जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जी कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महापुरात पडलेल्या घर अथवा झोपडपट्टीधारकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असावे आणि त्यांच्या नावावर दुसरे घर असू नये, अशा दोन प्रमुख निकषात बसणाऱ्या पूरग्रस्त कुटुंबांना घरे बांधून देण्यात येणार आहेत.