कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिली. त्यामुळे पहिलीपासून ते उच्चशिक्षण घेणाºया सर्वच वयातील विद्यार्थ्यांना मोबाईल हातात मिळाला. त्यातून अभ्यासाच्या नावाखाली दिवसभर मोबाईल हाताळणे सुरू झाले. त्यात काही मुलांकडून अभ्यासव्यतिरिक्त इतरत्र सर्चिंग सुरू झाले. अशातून अश्लील व्हिडिओ तसेच क्राईम व्हिडिओ बघून त्यातून चंदूर (ता. हातकणंगले) येथील एका चार वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार करून तिचा खून केल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करून अधिक तपास केला असता त्यांनी मोबाईलमधील व्हिडिओ बघून हे कृत्य केल्याचे सांगितले.
तसेच गतवर्षी झालेल्या एका खुनातील संशयित आरोपींनी दहशत माजविण्यासाठी मर्डरला वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादाची तयारी सुरू अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी दोन मुलांनी मुंबई येथून हुबेहुब बंदूक दिसणारे लायटर सुमारे एक हजार रुपयांमध्ये खरेदी केले. त्याचा वापर करत एका चित्रपटातील डायलॉग जोडून ती बंदूक हातात घेत दोघांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास करण्याऐवजी मुले इतरत्र सर्च करत भटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.