कोल्हापूर : पीटीएम ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळावर, तर दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस ‘अ’वर मात करीत सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई)तर्फे आयोजित फ्रू स्टार फुटबॉल महासंग्राम स्पर्धेत आगेकूच केली. शाहू स्टेडियम येथे गुरुवारी पहिला सामना पीटीएम ‘अ’ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला ‘शिवाजी’कडून कार्तिक बागडेकरने दिलेल्या पासवर चिंतामणी राजवाडे याने गोल नोंदवीत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. या गोलनंतर ३८ व्या मिनिटास पीटीएम ‘अ’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. ४० व्या मिनिटास पीटीएम ‘अ’च्या वृषभ ढेरेने गोल करीत सामन्यात आपल्या संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धात ५० व्या मिनिटास पीटीएम ‘अ’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली. शिवाजीकडून चिंतामणी राजवाडेने दिलेल्या पासवर कार्तिक बागडेकर याने गोल नोंदवीत सामना ३-२ असा रंगतदार स्थितीत आणला. अखेरपर्यंत ३-२ अशीच आघाडी कायम राखत पीटीएम ‘अ’ने सामना जिंकला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून पीटीएम ‘अ’च्या वृषभ ढेरे याची निवड झाली. दुसरा सामना दिलबहार ‘अ’ व प्रॅक्टिस ‘अ’ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच प्रॅक्टिस ‘अ’च्या राहुल पाटीलने गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. १३ व्या मिनिटास मुख्य पंच राजू राऊत यांनी दिलबहार ‘अ’ संघास पेनल्टी बहाल केली. यावर पेडरो गोन्साल्वीस याने गोल नोंदवीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर २० व्या मिनिटास दिलबहार ‘अ’कडून सनी सणगरने गोल नोंदवीत २-१ अशी आघाडी वाढविली. पुन्हा २८ व्या मिनिटास ‘दिलबहार’च्याच सचिन पाटीलने मैदानी गोल नोंदवीत ही आघाडी ३-१ अशी भक्कम केली. उत्तरार्धात प्रॅक्टिस ‘अ’कडून बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र, दिलबहार ‘अ’च्या भक्कम बचावफळीमुळे त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेरीस हा सामना ३-१ असा दिलबहार ‘अ’ने जिंकला. आजचे सामनेदु. २ वा. फुलेवाडी विरुद्ध खंडोबा ‘अ’दु. ४ वा. संध्यामठ विरुद्ध बालगोपाल वादावादी‘प्रॅक्टिस’चा राहुल पाटील व ‘दिलबहार’चा राहुल तळेकर यांच्यात सामन्यादरम्यान वादावादी झाली. त्यामुळे काही काळ सामना थांबला. पुन्हा पंचांनी दोघांना समज दिल्यानंतर सामना पूर्ववत सुरू झाला.
पीटीएम ‘अ,’ दिलबहार ‘अ’ विजयी
By admin | Published: May 27, 2016 12:45 AM