कोल्हापूर : हृषिकेश मेथे-पाटील, ओबे अकिम, वृषभ ढेरे, ओंकार पाटील यांच्या आक्रमक व वेगवान खेळीच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)चा २-१ असा पराभव करत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. हंगामातील हे ‘पाटाकडील’चे चौथे जेतेपद ठरले.शाहू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रारंभी प्रॅक्टिस क्लबकडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले यांनी वेगवान चाली रचत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटाकडीलच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यानंतर हृषिकेश मेथे-पाटीलने मिळालेल्या संधीवर डाव्या पायाने मारलेला फटका प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरयालने डावीकडे झेपावून बाहेर काढला. त्यानंतर तत्काळ झालेल्या चढाईत ‘प्रॅक्टिस’कडून राहुल पाटीलने गोलक्षेत्राबाहेरून मारलेला फटका पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल नारायणपुरे याने हाताने पंच करत बाहेर काढला. २९ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’च्या गोलक्षेत्रात बचावपटू अभिजित शिंदे यांच्या हाताला चेंडू लागला. त्यामुळे पंच राजू राऊत यांनी पाटाकडील संघास पेनल्टी बहाल केली. यावर वृषभ ढेरे याने गोल करत पाटाकडील संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धात सामन्यात बरोबरी साधण्याच्या इराद्याने प्रॅक्टिसकडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, सागर चिले यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांचे गोल करण्याचे मनसुबे ‘पाटाकडील’च्या रणजित विचारे, अक्षय मेथे-पाटील, इथो ओबेलो या बचावफळीने उधळून लावले. ७८ व्या मिनिटाला ‘पाटाकडील’कडून ओंकार पाटीलच्या पासवर हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आघाडी कमी करण्यासाठी ‘प्रॅक्टिस’कडून शर्थीचे प्रयत्न झाले. या प्रयत्नांना ८५ व्या मिनिटाला यश आले. प्रॅक्टिसला मिळालेल्या कॉर्नर किकवर इंद्रजित चौगुले याने गोल नोंदवत आघाडी २-१ ने कमी केली. या गोलनंतर पुन्हा एकदा ‘प्रॅक्टिस’कडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मात्र, अखेरपर्यंत त्यांना बरोबरी साधता आली नाही. अखेरच्या काही क्षणांत ‘पाटाकडील’कडून ओबे अकीमला गोल करण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. त्यात ‘प्रॅक्टिस’चा गोलरक्षक राजीव मिरयाल पुढे आला, पण ओबेला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. अखेरीस हा सामना २-१ ने जिंकत पाटाकडील संघाने हंगामातील चौथे जेतेपद पटकावून महापौर चषकावर नाव कोरले. विजेत्या पाटाकडील संघास १ लाख व चषक, तर उपविजेत्या प्रॅक्टिस संघास ५० हजार व चषक बहाल करण्यात आला.स्पर्धेचा बक्षीस समारंभ महापौर स्वाती यवलुजे यांच्याहस्ते झाला. यावेळी नगरसेवक सचिन पाटील, राहुल चव्हाण, दिलीप पोवार, संभाजी जाधव, लाला भोसले, राजसिंह शेळके, संतोष गायकवाड, नगरसेविका रिना कांबळे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, पोलीस निरीक्षक अनिल गुर्जर, प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक, इस्टेट मॅनेजर प्रमोद बराले आदी उपस्थित होते.सामन्याची ठळक वैशिष्ट्येअंतिम सामन्यातील दोन्ही संघांनी हलगीच्या कडकडाटात मैदानात प्रवेश केला.सामना सुरू होण्यापूर्वीच ‘प्रॅक्टिस’च्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीत फटाके उडविले.सामन्याच्या मध्यंतरात भारताचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधवचा आमदार हसन मुश्रीफ यांच्याहस्ते महापालिकेतर्फे १५ हजार किमतीचा मोबाईल देऊन सत्कार करण्यात आला.अंतिम सामना म्हटले की तणाव हा ठरलेला असतो. याही सामन्यात अखेरच्या काही क्षणांत मैदानातील खेळाडूंच्या किरकोळ वादावादीचे पडसाद समर्थकांतून उमटले. प्रेक्षक गॅलरीतून मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. ज्येष्ठ फुटबॉलपटू व पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी दोन्ही संघांच्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावर दोन्ही बाजूंचे समर्थक शांत झाले आणि सामना सुरळीत पार पडला.
‘पीटीएम’चा विजेतेपदाचा चौकार-महापौर चषकाचा मानकरी : हृषिकेश मेथे-पाटील ठरला सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:43 AM
कोल्हापूर : हृषिकेश मेथे-पाटील, ओबे अकिम, वृषभ ढेरे, ओंकार पाटील यांच्या आक्रमक व वेगवान खेळीच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ)चा २-१ असा पराभव करत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे
ठळक मुद्देप्रॅक्टिसला तिसऱ्यांदा जेतेपदापासून हुलकावणी