शिरोळ : शिरोळमध्ये लसीकरण केंद्रावर शुक्रवारी गोंधळ उडाला. १८ वर्षांपुढील व ४५ वर्षांपुढील नागरिक एकाचवेळी केंद्रावर आले होते. मात्र, १८ वर्षांपुढीलच नागरिकांना लस दिली जाणार असल्याने सकाळपासून रांगेत उभारलेल्या नागरिकांना परत फिरावे लागले. अखेर दुपारी लस उपलब्ध झाली. मात्र, आज शनिवारी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील केंद्र शाळेत स्वतंत्रपणे लसीकरण सुरू आहे. १८ ते ४४ वर्षांतील तसेच ४५ वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. नागरिकांची संख्या मोठी आणि लसीचा साठा कमी असेच चित्र दररोज पाहावयास मिळत आहे. केंद्राबाहेर गोंधळ उडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच केंद्राबाहेर दोन्ही वयोगटातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागाचीही चांगलीच पंचाईत झाली होती. दुपारनंतर लस उपलब्ध होणार असली तरी शनिवारी ज्येष्ठांचे लसीकरण होणार असल्याचे सांगितल्यानंतर नागरिक परत गेले. त्यामुळे लसींचा योग्य साठा उपलब्ध होणे गरजेचे बनले आहे.
फोटो - ०७०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.