कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता कंझ्युमर्सच्या (जनता बझार) कारभारी संचालकांवर ६३ लाख ६० हजाराच्या अपहारप्रकरणी फौजदारी दाखल झाली असली तरी त्यांच्यावर वसुलीची कारवाईही होणार आहे. लेखापरीक्षणाचा अहवालाच्या आधारे थेट ‘कलम ८८’ ची कारवाई करून संबंधितांवर जबाबदारी निश्चिती केली जाणार आहे. जनता बझार बंद पडून त्यावर प्रशासक मंडळ कार्यरत आहे. जुन्या-जाणत्या प्रतिष्ठित म्हणवणाऱ्यांनी संपलेल्या संस्थेतून ‘अर्थ’ शोधण्याचा प्रयत्न केला. राजारामपुरी व वरुणतीर्थ शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण दाखवून मोठा हात मारला. फरशी बसविणे, बदलणे, भिंतीचे नवीन बांधकाम, खिडकी दुरुस्ती, इलेक्ट्रिक वायरिंग बदलणे, डिझाईन करणे अशी मोघम स्वरूपातील कपोलकल्पित कामे केल्याचे दाखविले आहे. बांधकाम समिती नियुक्तीचा ठराव बोगस करून प्रोेसिडिंगमध्ये घुसडला आहे. विना बयाणा रकमेची निविदा काढली आहे, संपूर्ण प्रक्रियाच बोगस असल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला आहे. संगनमताने केलेल्या अपहाराची रक्कम मोठी असल्याने विशेष लेखापरीक्षक (ग्राहक) विष्णू कदम यांनी फौजदारी दाखल केली आहे. अशाप्रकारच्या अपहारामध्ये दोन कारवाई होऊ शकतात. पहिली क्रिमिनल अॅक्शन (फौजदारी)ची केली जाते. त्यानंतर सहकार न्यायालय अथवा जिल्हा उपनिबंधक ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चित करून वसुलीची प्रक्रिया राबवू शकतात. चौकशी करूनच अटक : सावंतकोल्हापूर : जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांतील ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (रा. शिवाजी पेठ), माजी उपमहापौर संस्थेचे चेअरमन उदय ऊर्फ उद्धव रा. पोवार (रा. शुक्रवार पेठ), प्रकाश परशराम बोंद्रे (शिवाजी पेठ) यांच्यासह अन्य आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांना साकडे घातले आहे. जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या खर्चाची खोटी कागदपत्रे तयार करून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग २ चे विष्णू गणपती कदम यांनी संस्थेचे चेअरमन उदय पोवार, संचालक प्रल्हाद चव्हाण (रा. शिवाजी पेठ), प्रकाश बोंद्रे (शिवाजी पेठ), तानाजी धोंडिराम साजणीकर (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), अरुण यशवंत साळोखे (रा. आपटेनगर), शिवाजी बा. घाटगे (रा. शिवाजी पेठ), नीरज कैलास जाजू (रा. नागाळा पार्क), कात्यायनी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक आनंदराव बा. फडतरे (रा. भुये, ता. करवीर) आदींच्या विरोधात फिर्याद दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हा अपहार चार वर्षांपूर्वीचा आहे. कागदोपत्री तपास असल्याने त्यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेवून आरोपींच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले जातील. त्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जनता बझारच्या ‘कारभाऱ्यां’कडून वसुली होणार
By admin | Published: February 21, 2017 1:36 AM