चिपळूण : गोवळकोट येथील भोईराज सभागृहामध्ये उद्या गुरुवार, ६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या कालावधीत सामूहिक भविष्याच्या शोधात या विषयावर लोकसंवाद होणार आहे. यावेळी श्याम असोलेकर, सत्यजित, शमीम शेख दस्तगीर, निरजा भटनागर, गुरुजित, पूज्यनीय हलीम, रामचंद्र कवलगी यांच्यासह अखिल दाभोळ खाडी भोई समाजाचे अध्यक्ष आर. आर. जाधव, सचिव शांताराम जाधव, संघर्ष समिती अध्यक्ष संतोष पडवळ, नऊगाव मानव हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हुसेन ठाकूर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिटाईम बोर्ड मुंबई, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, एमपीसीबी मुंबई प्रतिनिधी, प्रांताधिकारी खेड यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी २००३मध्ये सीईटीपी निर्माण करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्माणानंतर काही काळ प्रदूषण नियंत्रित होत असल्याचे जाणवत होते. परंतु, हा अनुभव क्षणिक होता. अचानक मासे मरण्याच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत व खाडीतील मत्स्य व्यवसाय धोक्यात आल्याने येथील मच्छिमारांचे जगणे कठीण झाले आहे. मच्छिमारांनी केलेल्या संघर्षामुळे सीईटीपीचे अपग्रेडेशन केले जाणार असल्याचे गेली ४ वर्षे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येते. मात्र, हा प्रकल्प नेमका काय आहे? त्याचे काम केव्हा पूर्ण होणार? व त्यामुळे प्रदूषणाचे नियंत्रण कसे होणार? याविषयी जनतेला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. दाभोळ खाडीतील प्रदूषणाचे नियंत्रण कसे करणार? तिच्या पुनर्निर्माणासाठी काय करावे लागेल? या मच्छिमारांचे आजचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या दिशेने कृती करण्याची आवश्यकता आहे. मेरिटाईम बोर्डाने खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी जाळी लावण्याचे परवाने देणे बंद केले आहे. या परवान्यांच्या प्राप्तीसाठी गेली दोन वर्षे संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरु आहे.तसेच खाडीतील मच्छिमारांसाठी मत्स्य व्यवसाय खात्याचा कोणताही कार्यक्रम या खाडीत राबवण्यात आलेला नाही. अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आणि मच्छिमारांच्या हितांच्या सुरक्षिततेसाठी या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले आहे. या कार्यक्रमाला एमआयडीसी, एमपीसीबी, मेरीटाईम बोर्ड, मत्स्य व्यवसाय खाते आदी यंत्रणांच्या प्रमुखांबरोबर विभिन्न क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणमुक्त खाडीसाठी आज लोकसंवाद
By admin | Published: November 05, 2014 10:38 PM