लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार उत्सव साजरा करावा लागत असल्यामुळे यंदाही गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. मात्र, शहर व परिसरातील अनेक मंडळांनी यावर्षी सजावटीवर अधिक भर दिल्याचे दिसून येते. श्री गणेशाच्या लहान मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून मंडपामध्ये मोठ्या प्रमाणात सजावट व विद्युत रोषणाई केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे नागरिकांना सर्वचबाबतीत खबरदारी घेत जगावे लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून, या काळात मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता असते. या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने व नियमानुसारच साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात गणेशमूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. गणपती मंडपाची उंची, निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंगची पर्यायी व्यवस्था करावी तसेच गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे, यासह अन्य नियम व अटी घातल्या आहेत.
शासनाच्या नियमानुसार सण साजरा करावा लागत असल्याने इतर गोष्टींवरील खर्चाचा विनियोग मंडळांनी मंडपातील सजावटीवर केला आहे. श्री गणेशाच्या लहान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून, मंडपामध्ये मोठ्या प्रमाणात सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. अनेक मंडळांनी एलईडी स्क्रीन लावली आहे. यावर विविध सामाजिक संदेश देणारे व थ्रीडी चित्रफीत दाखवण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे उपयोग केला आहे.
प्रतिक्रिया
गेल्यावर्षीच्या कडक लॉकडाऊनमुळे उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, यंदा बाजारपेठेत उलाढाल बऱ्यापैकी झालेली असल्याने उत्साह आहे. त्यामुळे घरगुतीबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या सजावटीवर नागरिकांचा कल अधिक आहे.
विशाल धुत्रे, जी डी आर्टिस्ट
१४०९२०२१-आयसीएच-०५
१४०९२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीतील कलानगर येथे गणेशोत्सव मंडळाने आकर्षक मंडप उभारून सजावट केली आहे.
छाया-उत्तम पाटील