कोल्हापूर : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व जन स्वास्थ्य अभियानामार्फत सरकारी व खासगी आरोग्य सेवांमध्ये होणाऱ्या रुग्ण हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी पश्चिम विभागीय जनसुनावणी होणार आहे, अशी माहिती या जनसुनावणीच्या संयोजक संघटना असलेल्या संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या सचिव मीना शेषू यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे मंगळवारी दिली.राष्ट्रीय मानव अधिकार आयोगामार्फत रुग्ण हक्कांच्या उल्लंघनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यवस्थात्मक व नियामक कारणांचीही चौकशी केली जाणार आहे. यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात आरोग्यसेवेचा अधिकार यावर विभागस्तरीय जनसुनावणी होणार आहे. यात राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागीय जनसुनावणी मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत होणार आहे. या जनसुनावणीत आयोगाचे सदस्य व तज्ञांचे पॅनेलचा सहभाग असेल. आरोग्य व्यवस्थेच्या अभावामुळे, धोरणात्मक कारणामुळे जर आरोग्य हक्कांचे उल्लंघन होत असेल तर अशा प्रकरणांचाही यात समावेश होणार आहे. ही सुनावणी दोन दिवस चालणार आहे. सहा सत्रात प्रत्यक्ष साक्ष, सेवांचा, आरोग्य संस्थांचा अभ्यास आणि सर्व्हेक्षण करुन मांडण्यात आलेली केस स्टडी, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते व तज्ञांचे सादरीकरण यांचा वापर यात होणार आहे. या जनसुनावणीमध्ये आरोग्य सचिव, राज्याचे आरोग्य संचालक, मोहिमेचे संचालक, राजीव गांधी जीवनदायी सोसायटीचे सीईओ, मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख, ग्राहक संरक्षण परिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सरकारी आरोग्य व्यवस्थेबाबत तीन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. महिला, दलित, आदिवासी, कामगार यांच्या आरोग्य संबंधित मुद्द्यांवर विशेष भर असणार आहे. या सुनावणीत सहभागी होउ इच्छिणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींनी जन आरोग्य अभियान, पोस्ट बॉक्स नं १९३१, माजी सैनिक वसाहत, पोस्ट आॅफिस, कोथरुड, पुणे येथे संपर्क साधावा असे आयोगामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य हक्कांवरील जनसुनावणी नोव्हेंबरमध्ये
By admin | Published: September 08, 2015 11:52 PM