: भडगावात विकासकामांचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : केवळ लोकसेवेचे व्रत घेऊन मुश्रीफ यांनी बहुजन समाजाला आपलेसे करून नेतृत्व केले. राजसत्तेच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, गरिबी यावर मात केली, गोरगरिबांचे अश्रू पुसले. राजकीय वारसा नसतानाही कर्तुत्वाच्या जोरावर जनतेला आपलेसे केले. त्यांच्या हातून अजूनही लोककल्याणाचे बरेच कार्य बाकी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
भडगाव (ता. कागल) येथे ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमिपूजन, मरगुबाई मंदिर वास्तूशांती व दीड कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून घाटगे बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जनतेने मला एवढे भरभरून दिलं आहे की, या जन्मीच काय, सात जन्मीसुद्धा जनतेच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. विकासकामांच्या माध्यमातून मी जनतेचे पांग फेडीन. यावेळी मरगुबाई मंदिर वास्तूशांती, ग्रामदैवत हनुमान मंदिर भूमिपूजन आदी कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला मनोज फराकटे, एम. एस. पाटील, सरपंच दिलीप चौगले, उपसरपंच बी. एम. पाटील, ज्ञानदेव म्हांगोरे, दत्तात्रय सोनाळकर, बाबासो चौगले, समाधान राणे, रखुनाथ पाटील, मधुकर कांबळे, भिकाजी माने, धोंडीराम भांडवले, विश्वनाथ खतकर, पांडुरंग चौगले, रणजित खतकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट
आम्ही दोघे मित्र
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी आणि संजय घाटगे आम्ही दोघेही कॉलेजचे मित्र. आम्ही दोघेही क्रिकेटपटू, फास्ट बॉलर, राजकारणातही स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली एकाच गटात काम केले. परंतु; पुढे आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. आजही हे मैत्रीचं नातं घट्ट आहे.
फोटो ओळ - भडगाव (ता. कागल) येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या एक कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, मनोज फराकटे, माजी सरपंच एम. एस. पाटील, सरपंच दिलीप चौगुले, उपसरपंच बी. एम. पाटील उपस्थित होते.