कोल्हापूर : जातिधर्माचे भांडण नको... पोटापाण्याचे बोला... स्टंटबाजी बंद करा... अशा घोषणा देत, शनिवारी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघातर्फे गिरणी कामगार, पेन्शनर, बांधकाम कामगार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहावर मोर्चा काढून पालकमंत्र्यांना इशारा दिला; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील बाहेरगावी असल्याने त्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार शैलजा पाटील यांनी निवेदन स्वीकारले. दुपारी एकच्या सुमारास अंगणवाडी कर्मचारी महिला, बांधकाम कामगार, पेन्शनर, आदी मोठ्या संख्येने महावीर उद्यान येथे एकत्र जमले. येथून हा मोर्चा सुरू झाला. बसंत-बहार टॉकीज, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, किरण बंगला, धैर्यप्रसाद हॉलमार्गे तो शासकीय विश्रामगृहावर नेण्यात आला. मोर्चात कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभागांतील सुमारे दोन हजारांहून अधिक पेन्शनर, गिरणी कामगार, अंगणवाडी कर्मचारी, शेतमजूर, आदी सहभागी झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील बाहेरगावी असल्याने तहसीलदार शैलजा पाटील यांनी निवेदन स्वीकारले. आठवड्यात मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. महासंघाचे सचिव उदय भट, अतुल दिघे यांनी मार्गदर्शन केले. एका आठवड्यात थकीत मानधन न दिल्यास जिल्हा परिषदेला टाळे ठोकण्याची भूमिका सुवर्णा तळेकर यांनी जाहीर केली. आंदोलनात जुलेखा मुल्लाणी, कुसुम पवार,आप्पा कुलकर्णी, गोपाळ पाटील, नाना जगताप, रामजी देसाई, सदाशिव खोपडे, शंकर पाटील, प्रतिभा कांबळे, शांताराम पाटील, भाऊ पाटील, धोंडिबा कुंभार, राजू शेलार, भाऊसाहेब पाटील, विमल गुरव, राजश्री चव्हाण, मेघा शिंदे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
...तर जनता माफ करणार नाही
By admin | Published: February 15, 2015 12:36 AM