सांगरूळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर) मध्ये राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांची जिल्ह्यात चर्चा झाली होती. ‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार राजाराम लोंढे यांनी ‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले, यावेळी गावागावांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केले. मात्र सांगरूळ गावाने घेतलेली दक्षता, शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता राबवलेली यंत्रणेचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आले. हा पॅटर्न कसा राबविला, त्याची संकल्पना काय होती, यामध्ये सर्व राजकीय मतभेद विसरून गाव कसे एकसंध झाले, साडेतीन महिने कोरोनाची महामारी गावाच्या वेशीबाहेर कशी रोखली. हे सगळे ‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ या पुस्तकरूपाने राजाराम लोंढे यांनी मांडले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, ॲड. सुरेश कुराडे, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक, सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, सुभाष सातपुते, मधुकर जांभळे, भगवान लोंढे, पुंडलिक पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अर्चना खाडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर)मध्ये राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांबद्दल ‘लोकमत’चे वरिष्ठ पत्रकार राजाराम लोंढे यांच्या ‘लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. सुरेश कुराडे, निवृत्ती चाबूक, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते. (फोटो-२८१२२०२०-कोल-सांगरूळ)