कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्रातर्फे दोन ग्रंथांचे प्रकाशन शनिवारी (दि. ६) सकाळी अकरा वाजता विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहात ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असणार आहेत. यावेळी या संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या ‘शाहू छत्रपती : राजा आणि क्रांतिकारक’ आणि ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर चळवळ’ या ग्रंथांचे प्रकाशन होईल. न्यायमूर्ती जी. एन. वैद्य यांच्या व्याख्यानांची मराठी आवृत्ती ‘शाहू छत्रपती : राजा आणि क्रांतिकारक’ हा ग्रंथ आहे. त्याचे अनुवादक प्रा. चंद्रकांत गायकवाड आहेत. मद्रास विद्यापीठातील डॉ. चंद्रा मुदलियार यांच्या व्याख्यानांची मराठी आवृत्ती ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर चळवळ’ हा ग्रंथ असून, त्याचा अनुवाद प्रा. दिलीप पंगू यांनी केला आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी झालेली व्याख्याने इंग्रजी पुस्तकामध्ये होती. ती काहीशी विस्मृतीमध्ये गेल्यासारखी स्थिती होती. ही व्याख्याने कोल्हापूरच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांचा मराठी ग्रंथामध्ये अनुवाद केला असल्याचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्रातर्फे उद्या दोन ग्रंथांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:23 AM