कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला आज, मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुर्गादेवी रुपात पूजा बांधण्यात आली. जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, कोल्हापूर सराफ संघ व हॉटेल मालक संघाच्यावतीने परस्थ भाविकांना कोल्हापूरची ओळख व्हावी यासाठी भेटवस्तू देण्यात आल्या.नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची दुर्गादेवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. तत्पूर्वी कोल्हापूरातील करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.. ही देवी अष्टभूजाधारिणी असून सिंहावर बसली आहे. देवीच्या शिरावर चंद्रमाचा मुकूट आहे. या देवीचे वर्णन दुर्गासप्तशतीमध्ये केले आहे. दुर्गम नावाच्या असुराचा वध केल्याने मला दुर्गा या नावाने संबोधले जाईल असे देवीने म्हटले आहे. या दुर्गेने शैलपूत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री हे अवतार घेतले. ही पूजा पूजारी अनिल कुलकर्णी, नारायण कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.देवीची ओटी, अंबाबाईचे छायाचित्र असलेले कॅलेंडर, कोल्हापूर सराफ संघातर्फे कोल्हापूरी साज, ठुशी तर हॉटेल मालक संघाच्यावतीने गुळ, काकवी, चटणी, मसाला अशी शिदोरी भेट म्हणून देण्यात आली. मंगळवार असल्याने दुसऱ्या दिवशीही भाविकांची अंबाबाईच्या दर्शनाला मोठी गर्दी होती.
Navratri2022: दुसऱ्या माळेला अंबाबाई 'दुर्गादेवी रुपात', जिल्हा प्रशासनाकडून भक्तांना भेटवस्तू
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 27, 2022 5:31 PM