बेळगाव : मुंबईतील कुख्यात गुंड रवी पुजारीने मंगळवारी दुपारी आपल्याला मोबाईलवर दोनवेळा फोन करून खंडणी मागितल्याची माहिती ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे आमदार संभाजी पाटील यांनी बुधवारी महापालिकेत पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री सी. के. जॉर्ज यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बेळगाव पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. आमदार पाटील म्हणाले, मंगळवारी दुपारी कुख्यात गुंड रवी पुजारीने आपल्याला फोन केला. यावेळी पुजारीने आपल्याकडे पैशांची मागणी केली. मी काय आपल्याकडून कोट्यवधींची अपेक्षा करत नसून, आपण बांदिवडेकरांसारख्या गुंडांना मदत करता, अशी मदत आम्हालाही करा, असे पुजारीने म्हटल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. आमदार पाटील महापौरपदाची निवडणूक लढविण्याच्या कारणावरून चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी चारवेळा बेळगावचे महापौरपद भूषविले आहे. पाटील हे बेळगाव दक्षिण मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले आहेत. शनिवारी (दि. ७) महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुजारीकडून फोन केला गेला आहे काय? याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)
संभाजी पाटील यांच्याकडे पुजारीने मागितली खंडणी
By admin | Published: March 05, 2015 12:41 AM