कोल्हापूर : ‘पोलिओ’चे कायमचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रविवारी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम दिवसभर राबविण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बालकांना ‘पल्स पोलिओ’चा डोस पाजून सीपीआर रुग्णालयातून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
दिवसभर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटांतील सुमारे तीन लाखांहून अधिक बालकांना लसीकरण मोहिमेत ‘पोलिओ’चे डोस देण्यात आले, त्यापैकी कोल्हापूर शहरात सुमारे ४२९८८ बालकांना पोलिओ लस देण्यात आली. रविवारचा दिवस हा ‘राष्ट्रीय पोलिओ दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सुरुवातीला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर फित कापून आणि श्रीफळ वाढवून लसीकरण मोहिमेस प्रारंभ केला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकास ‘पल्स पोलिओ’चा डोस पाजण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक विलास देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कदम, आदी उपस्थित होते.जिल्ह्यात किमान साडेतीन लाख बालकांना पोलिओचे डोस पाजण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले होते. दिवसभरात सुदृढ, अशक्त, आजारी, नवीन जन्म, अशा सर्व ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओ लस पाजण्यात आली.
दुपारपर्यंत जिल्ह्यात सुमारे २०८० बूथवर सुमारे तीन लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. त्यापैकी ग्रामीण भागात दोन लाखांपर्यंत बालकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात सुमारे २०८० बूथ उभारले होते, तर त्यापैकी २७९ बसस्टँडवरही बूथ उभा करून बालकांना लसीकरणाचे डोस देण्यात आले.
पोलिओ लसीकरणातून कोणतेही बालक सुटू नये; यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रीय होती. बहुतांशी बालकांना बूथवर सकाळीच डोस देण्यात आले होते. यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी यांच्या पथकाने विशेष सहकार्य केले.महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शहरातील लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त धनंजय अांधळे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. अमोल माने, आदी अधिकारी उपस्थित होते.
शहरामध्ये ४८६८९ पैकी ४२९८८ बालकांना पोलिओ लस पाजली. उर्वरित मुलांना पुढील पाच दिवसांत घरोघरी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी शहरात १७३ कें दे्र होती. महापालिकेच्या वतीने १२४१ कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.लसीकरणासाठी फिरती पथकेशहरामध्ये येणाऱ्या लाभार्थींना फिरत्या पथकामार्फत लस पाजण्यात आली. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, अंबाबाई मंदिर, शहरात येणारे रस्त्यावरील नाके, ऊसतोड कामगार वस्त्या, वीटभट्ट्या, मोठी बांधकामे या ठिकाणी लाभार्थींना लस पाजण्यात आली.पुढील पाच दिवस घरोघरी मोहीममोहिमेद्वारे काही बालके काही कारणास्तव डोस घेण्याचे चुकल्यास त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी सर्व्हेसाठी पथके पाठवून त्यांनाही लस पाजण्यात येणार आहे.