कोल्हापूर : दुष्काळाच्या झळा आतापासूनच बाजारात जाणवू लागल्या आहेत. हरभराडाळ, तूरडाळीसह ज्वारीचे दर चांगलेच कडाडले आहेत. तूरडाळ प्रतिकिलो दहा, तर हरभराडाळ पाच रुपयांनी महागली आहे. हायब्रिड ज्वारी व शाळूचे दर चांगले भडकले आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचा बाजार स्थिर असून फळबाजारात अंजिरांची आवक झाली आहे. बोरांची आवक दुप्पट झाल्याने दरात घसरण झाली आहे.
यंदा आॅक्टोबरपासूनच महाराष्ट्रात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मार्च-एप्रिलनंतर भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. तिचे पडसाद आता बाजारपेठेवर दिसू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून हायब्रिड ज्वारी व शाळूच्या दरांत वाढ होत चालली आहे. हायब्रिड ज्वारी २८ रुपये तर शाळू ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तूरडाळीने तर मोठी उडी घेतली असून प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. हरभराडाळ पाच रुपयांनी महागली असून, एकूणच कडधान्यांच्या दरांत वाढ झाली आहे. सरकीच्या तेलाच्या दरात मात्र घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात ८१ रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. शाबूच्या दरातही थोडी घसरण झाली आहे.
स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फ्लॉवर, वांगी, ओला वाटाणा, वरण्याच्या दरांत घसरण झाली आहे. ढबू, गवार, कारली, भेंडी, दोडक्याचे दर स्थिर आहेत. कोथिंबिरीची आवक मंदावल्याने दरात थोडी वाढ झाली असून, घाऊक बाजारात तीन ते सात रुपये पेंढीपर्यंत दर आहे. मेथी, पालक, पोकळ्याच्या दरांत चढउतार दिसत नाही.
फळबाजारामध्ये संत्री, चिक्कू, सफरचंद, डाळिंब, पेरूंची आवक वाढली आहे. बोरांची आवक वाढली असून घाऊक बाजारात आठ ते १२ रुपये किलोपर्यंत दर आहे. अंजिरांची आवक सुरू झाली असून मागणीही चांगली आहे. कैरीची आवक सुरू असून दर २५ ते ४० रुपये प्रतिकिलो आहे. स्ट्रॉबेरी, आवळा, किव्ही, पपईची आवकही चांगली आहे.लाल मिरची स्वस्त होण्याची शक्यताकर्नाटक व आंध्रप्रदेशमधून लाल मिरचीची कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आवक होते. यंदा तिथे या मिरचीला पोषक असा पाऊस व हवामान राहिल्याने पीक चांगले आहे. त्यामुळे लाल मिरची स्वस्त होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.टोमॅटो, कोबी रुपया किलोटोमॅटोची रोज तीन हजार कॅरेटची आवक असल्याने दर कमालीचे घसरले आहेत. घाऊक बाजारात एक ते आठ रुपये दर आहे. कोबीची आवकही वाढल्याने एक ते पाच रुपये प्रतिकिलोचा दर राहिला आहे.कोल्हापुरात अंजिरांची आवक झाली असून, ग्राहकांची मागणीही चांगली आहे. रविवारी लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात विक्रेत्यांनी अंजिरांची अशी आकर्षक मांडणी केली होती.