लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळींच्या दरांत कमालीची घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी दहा रुपयांनी दर कमी झाले असून, घाऊक बाजारात एक नंबर तूरडाळ ५७ रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाला बाजारामध्ये आवक मंदावल्याने थेट दरावर परिणाम झाला असून, दर चांगलेच कडाडले आहेत. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तोतापुरी व नीलम आंब्यांची आवक मात्र जोरात दिसत आहे.
यंदा तुरीचे उत्पादन वाढल्याने दर हळूहळू खाली येत आहेत. उत्पादन वाढले असले तरी तूर व हरभरा डाळ इतक्या खाली येईल, असे वाटत नव्हते. घाऊक बाजारात तूरडाळ ५७ रुपये, तर हरभरा डाळ ७० रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन ग्राहकांनी मे महिन्यातच डाळीचा साठा करून ठेवल्याने सध्या डाळींना बाजारात मागणी नाहंी. त्याचबरोबर उत्पादन वाढल्याने डाळींच्या दरांवर दुहेरी परिणाम झाला आहे.
मूगडाळ, मसूर डाळींच्या दरातही किरकोळ प्रमाणात चढउतार दिसत आहे. शाबूचे दर मात्र स्थिर असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलो ७० रुपये दर आहे. सरकी तेलाच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. साखरेचे दर मात्र हळूहळू खाली येऊ लागले असून, घाऊक बाजारात ३८ रुपयांपर्यंत दर आले आहेत. ज्वारीची मागणी कायम असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही. ज्वारीचे दर २२ पासून ३० रुपयांपर्यंत राहिले आहेत. तांदळाच्या दरात थोडी वाढ झाली असून ‘रत्नागिरी-२४’सह इतर लहान तांदळांच्या दरांत किलोमागे चार रुपयांची वाढ दिसत आहे.
भाजीपाला बाजारात आवक कमालीची मंदावली आहे. स्थानिक भाजीपाला बऱ्यापैकी कमी झाला आहेच. त्यात संपामुळे परजिल्ह्यांतील भाजीपाला येत नसल्याने दर चांगलेच कडाडले आहेत. भाज्यांचे दर ६० पासून ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांची चांगलीच दमछाक होत आहे. आंब्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असून दरातही घसरण झाली आहे. हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात ४०० ते ११०० रुपयांपर्यंत पेटीचा, तर १०० पासून ४०० रुपयांपर्यंत बॉक्सचा दर आहे. पायरी, लालबाग, मद्रास हापूसची आवकही सुरू आहे. तोतापुरी व नीलम आंब्यांची आवक थोडी वाढली आहे.
वटपौर्णिमेमुळे आंब्याला मागणी
वटपौर्णिमा गुरुवारी (दि. ८) आहे. त्यामुळे आंब्याची मागणी वाढली आहे. येत्या चार दिवसांत दरातही थोडी वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
कांद्याच्या दरात वाढ!
कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांदा ६० ते ८० रुपयांपर्यंत दर असून गत आठवड्यापेक्षा किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. बटाट्याच्या दरातही थोडी वाढ झाली आहे.