जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा त्यांनी केला.
एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठं घडवलं जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये एका वाहिनीचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.
राज ठाकरे म्हणाले,
>> आजच्या सरकारच्या काळात वर्तमानपत्रं, वाहिन्या, सीबीआय, रिझर्व्ह बँक, पोलीस, लष्कर या सगळ्यांमध्ये दोन गट झालेत. हे लक्षण देशासाठी चांगलं नाही.
>> निवडणुकीच्या तोंडावर युद्धाच्या, काश्मीरच्या बातम्या सुरू झाल्या आणि चार-साडेचार वर्षं ज्यावरून आरडाओरड सुरू होती, ते विषय बंद झाले.
>> नीरव मोदी, चोक्सी ही लोकं मोदींच्या काळात हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाली. त्यावेळी श्रीदेवी गेल्याची बातमी आली आणि सगळ्या बातम्या बाजूला पडल्या.
>> आता पुलवामा हल्ल्याच्या बातम्या सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान एवढंच तुमच्यापुढे उभं केलं जातंय. एक बुवाजी उभा करायचा आणि देशाचं लक्ष त्याच्याकडे वळवायचं, हे अमेरिकेत अनेक वर्षं चालत आलंय. तेच आपल्याकडेही सुरू आहे.
>>अजित डोवाल यांची कसून चौकशी झाली ना तर काय प्रकरण होतं, आंतरराष्ट्रीय पातलीवर काय घडतंय, हे सगळं बाहेर येईल
>> पाकिस्तानचं पाणी तोडणार आहेत. नळातून द्यायचात का पाणी? आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे काही असतो की नाही?
>> पाकिस्तानचं पाणी बंद करणार आहेत. मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार आहात का नदीत?
>> पुलवामाच्या हल्ला झाला, तेव्हा नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. घटना कळल्यावरही ते निघाले नाहीत. या माणसाने ताबडतोब दिल्लीला यायला पाहिजे होतं, पण ते नाही आले. उलट भाषणं करत मतं मागताहेत.