राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर मनात अपार कष्ट उपसण्याची तयारी, आई-वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून केलेल्या प्रयत्नामुळेच सांगरूळ (ता. करवीर) येथील पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा योगेश दगडू नाळे याने सी. ए. परीक्षेत यश मिळविले. प्रबळ इच्छाशक्तीने प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे बळ दिल्यानेच योगेश येथपर्यंत पोहोचला. योगेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगरूळमध्येच झाले. घरी अठराविश्वे दारिद्र्य, गावात भाड्याच्या जागेत वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान, संसाराचा गाडा चालवीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च करताना त्यांची कसरत करावी लागते. हे पाहून योगेशने शाळेला जाण्यापूर्वी सकाळी सात ते दहा वडिलांबरोबर दुकानात काम करण्यास सुरुवात केली. ‘आयटीआय’ करावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्यानुसार त्याने प्रवेश घेतला; पण प्रवेश निश्चितीचे पत्र न मिळाल्याने त्याने अकरावी कॉमर्सला जाण्याचा निर्णय घेतला. सायकल दुकानात काम करीत खाडे महाविद्यालयातून त्याने बी. कॉम. केले. दुसऱ्या वर्षात असतानाच योगेशने ‘सी. ए.’ होण्याचे ठरविले. खासगी कंपनीत काम करीत पात्रता परीक्षा दिली; पण तीन वेळा अपयश आले. न खचता तो परीक्षा देत राहिला. शिवाजी विद्यापीठात एम. कॉम.साठी प्रवेश घेतला, तेथेच टर्निंग पॉइंट मिळाला. एम. कॉम.मध्ये विद्यापीठात पाचवा क्रमांक पटकावीत त्याने सी. ए.ची अंतिम परीक्षा दिली. त्यात यश आले नाही, नाउमेद न होता साडेतीन महिने पुणे येथे क्लासला रुजू केला. अखेर नोव्हेंबर २०१५ ला ‘सी. ए.’ची परीक्षा उत्तीर्ण झाला. आनंदात वडिलांची उणीव! योगेशचे वडील दगडू नाळे हे पाच वर्षांपूर्वी घरातून निघून गेले आहेत. वडिलांनी हाडाची काडे करून शिकविले, वाढविले. त्यांच्या कष्टांमुळेच ‘सी. ए.’ होता आले; पण हा आनंद साजरा करताना योगेशला वडिलांची उणीव भासत आहे. मुलग्याने घेतलेली गगनभरारी पाहून वडील घरी येतील, अशी योगेशला अपेक्षा आहे.
पंक्चरवाल्याचा मुलगा ‘योगेश’ झाला ‘सी. ए.’
By admin | Published: January 24, 2016 12:50 AM