लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जुलैमध्ये आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्याचे काम सोमवारी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. सुमारे ७१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून दोन दिवसांत व्यक्तिनिहाय पंचनामे कृषी विभागाकडे सादर केले जाणार आहेत. त्यानंतर त्याची छाननी करून कृषी आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत.
महापूर व अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्यावतीने नुकसान झालेल्या शेती व पिकांचे पंचनामे करण्यात आले. गेली तीन आठवडे पंचनाम्याचे काम गावपातळीवर सुुरू होते. जिल्ह्यात साधारणत: ७० हजार हेक्टर क्षेत्र हे पूरबाधित आहे. गाव पातळीवर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी पंचनामे केले आहेत. सोमवारी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित यंत्रणेकडून तालुका पातळीवर नुकसानग्रस्तांच्या याद्या पाठविल्या जाणार आहेत. तालुका पातळीवरून कृषी विभागाकडे याद्या येतील, त्याचे एकत्रिकरण केले जाईल. त्यानंतर कृषी विभाग छाननी करणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे याद्या पाठविल्या जाणार आहेत. येथून मदत व पुनर्वसनाकडे भरपाईच्या रकमेची मागणी केली जाते. या सगळ्या प्रक्रियेला किमान महिन्याचा कालावधी जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात मदतीची रक्कम पडण्यास ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज आहे.
गावनिहाय छाननी होणार
तालुका पातळीवरून आलेल्या याद्यांची गावनिहाय छाननी होणार आहे. यामध्ये त्या गावात पडलेला पाऊस, पुराच्या पाण्याची पातळी व अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा याची छाननी कृषी विभागामार्फत केली जाणार आहे.
कोट-
पुराचे पाणी, दलदलीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात पंचनाम्यात अडथळे आले. सोमवारी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत छाननी करून यादी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली जाईल.
- ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)