जिल्ह्यात २० ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान, घरे, दुकानांचा पडझड, जनावरे वाहून जाणे, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये भरलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील ४११ गावांना फटका बसला असून, ३७७ गावं काही प्रमाणात व ३४ गावं पूर्ण बाधित झाली आहेत. सात नागरिकांचा मृ्त्यू झाला असून, १०४ जनावरांनाही महापुराने आपल्या कवेत घेतले आहे. या सगळ्या नुकसानाची अंदाजे रक्कम २४३ कोटी ३५ लाखांवर गेली आहे. करवीर आणि शिरोळ तालुक्यात या नुकसानाचे प्रमाण अधिक आहे.
सध्या पुराचे पाणी ओसरत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शेतीतील नुकसानाचे पंचनामे हा यातील महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय घरे, दुकानांमधील माल, अन्य मालमत्ता, जनावरांचा मृत्यू, प्रापंचिक साहित्याचे नुकसान या सगळ्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली असून, भागनिहाय तलाठी, लिपीक, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
----
जागेवर जावून व्हावेत पंचनामे
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ज्यांचे नुकसान झालेले नाही, अशा लोकांची नावेही घालण्यात आली होती. शिरोळ आणि करवीर तालुक्यात ही बोगसगिरी जास्त प्रमाणात झाली होती. न्यायालयापर्यंत प्रकरण जावून संबंधितांकडून वसुली करण्यापर्यंतचे प्रकार झाले. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही याचा ठपका बसला. दुसरीकडे अजूनही काही पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जावून पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
----