कोल्हापूर : पाऊस ओसरल्याने आता वादळाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची घाई उडाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गावपातळीवरील यंत्रणा वेगावली आहे. शनिवारी तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक या त्रिस्तरीय यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू झाले असून, आठवडाभरात अहवाल तयार होणार आहे.गेला आठवडाभर कोसळलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, भाजीपाला या पिकांचे नुकसान मोठे आहे. यातही भाताचे नुकसान सर्वाधिक आहे. या पिकांची कापणी, मळणी सुरू असतानाच ढगफुटीसारख्या आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. नुकसानीचा टक्का जास्त असल्याने शेतकरी हतबल झाला असून पंचनाम्याची मागणी होत होती.त्यानुसार कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज अहवाल तयार केला, त्यात साधारणपणे २३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे गृहीत धरून पुढील पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महसूल व कृषी यंत्रणांना पंचनाम्याची प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला अधिक दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्यक्ष शिवारात, बांधावर जाऊन पाहणी करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले. अजूनही अधूनमधून पाऊस असल्याने फेरपंचनामेही करावे लागणार असल्याने अहवाल तयार करण्यासाठी आठवडाभराचा अवधी दिला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी