आजरा : गेल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे आजरा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी बुधवारी दिले. उद्या (गुरूवार, दि. २९)पासून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात होणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त समिती पंचनामे करून अहवाल सादर करणार आहे.
कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यामध्ये निश्चित वाढ होणार आहे. तालुक्यात दि. २२, २३ व २४ जुलै दरम्यान उच्चांकी पाऊस झाला आहे. या पावसाने ओढे-नाले व नद्यांचे पाणी शेतजमिनीत घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीचे पाणी शेतात घुसल्याने पिके वाहून जाणे, शेतातील बांध वाहून जाणे, अनेक पिकांवर दगड-गोटे, माती-वाळू यांचा थर तयार झाला आहे. पावसानंतर ऊस व भातपिके पिवळी पडली आहेत. काही ठिकाणी पिकांवर किडीचा प्रादुर्भावही झाला आहे. मुसळधार पावसाने घरांची पडझड होऊन अंदाजे ४५ लाखांच्या दरम्यान नुकसान झाले आहे.
आजरा तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पिकांच्या, घरांच्या पडझडीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावात जाऊन कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन माहिती घेणार आहेत.
ग्रामसेवक संबंधित शेतकरी हा त्याच गावचा आहे, तलाठी संबंधित शेतकऱ्याचे जमिनीचे क्षेत्र सांगणार आहेत आणि कृषी सहाय्यक संबंधित शेतकऱ्याच्या किती क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी अहवालामध्ये नमूद करणार आहेत. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे आठ दिवसांत तयार करून त्याचा अहवाल आजरा तहसीलदारांना दिला जाणार आहे.
चौकट :
स्थलांतरित कुटुंब घरी परतली
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्व बंधाऱ्यांवरील पाणी कमी झाले असून, पूरपरिस्थिती आटोक्यात आली आहे. तालुक्यातील ८८ कुटुंबांमधील ३६० नागरिक पुरामुळे स्थलांतरित झाले होते. या स्थलांतरित नागरिकांनी पुराचे पाणी कमी झाल्याने मंगळवारी आपली घरे स्वच्छ केली आहेत. स्थलांतरित कुटुंब बुधवारी आपापल्या घरी परतली आहेत.