कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त मिळकतींचे पंचनामे उद्या (मंगळवार)पासून सुरू करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळासमवेत त्यांनी चर्चा केली.
‘कोल्हापूर चेंबर’च्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेऊन जिल्हा आणि शहरातील सर्व पूरग्रस्त व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांचा सर्व्हे लवकर करून पंचनामे त्वरित करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवारपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांच्या मिळकतींचा सर्व्हे लवकर करून पंचनामे करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करत असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, सचिव धनंजय दुग्गे, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.
चौकट
शहरात ३,९१४ पूरग्रस्त मिळकती
महानगरपालिका हद्दीत महापुराच्या पाण्यात सुमारे ३,९१४ मिळकती अडकल्या आहेत. त्यांच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने पथके नियुक्त केली आहेत.
चौकट
पंचनामे त्वरित होणे आवश्यक
सन २०१९ मध्ये आलेल्या पुराच्या पातळीपेक्षा यावर्षी पुराची पातळी दीड ते दोन फूट जास्त होती. कोरोनामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करण्यासाठी वेळेचे बंधन असल्यामुळे ते कोणतीही हालचाल करू शकले नाहीत. बहुतांश व्यापाऱ्यांच्या दुकानातील माल हा नाशवंत असल्याने तो या महापुरामुळे खराब झाला आहे. या खराब झालेल्या नाशवंत मालाची दुर्गंधी पसरण्याआधी तो टाकून द्यावा लागणार आहे. यासाठी खराब नाशवंत मालाचे सर्व्हे लवकर करून पंचनामे त्वरित होणे आवश्यक असल्याची मागणी ‘कोल्हापूर चेंबर’ने केली.