जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावे बाधित झाली होती. बाधित गावांमधील शेती पीक, घरांची पडझड, तसेच सानुग्रह अनुदानाबाबत शासकीय यंत्रणेमार्फत गावोगावी पंचनामे सुरू आहेत. पंचनामे गतीने पूर्ण होण्यासाठी ज्यादा २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज शनिवारपासून पंचनामे लवकर पूर्ण होणार आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
सध्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून १८ अधिकारी व कर्मचारी पूरबाधित गावांमध्ये जाऊन पंचनाम्याचे काम पूर्ण करीत आहेत; परंतु नुकसानीचे स्वरूप पाहता पंचनाम्यासाठी ज्यादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत होती. पंचनामे तातडीने पूर्ण झाले तरच शेतीमध्ये तातडीने मशागत करून पुढचे पीक घेता येणार आहे. यासाठी पंचनामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी बोलून पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश दिले होते. याचाच भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी यांनी आज शनिवारपासून पंचनामे गतीने होण्यासाठी आणखी २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याने शिरोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे गतीने होणार असल्याची माहिती मंत्री यड्रावकर यांनी दिली. सध्या अठरा गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित २५ गावांमधील पंचनाम्याचे काम आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.