कोल्हापूर : फ्रान्स एअरलाइन्सचे ते जंबो विमान... त्यामध्ये ३५० प्रवासी. विमान पॅरिसहून टोरंटोकडे झेपावून चार तास झाले होते आणि अचानक पायलटच्या छातीत कळा सुरू झाल्या. कोणी डॉक्टर आहेत का, अशी विचारणा झाल्यावर कोल्हापूरचे डॉक्टर दाम्पत्य क्षणाचाही विलंब न लावता धावले व त्यांनी त्या पायलटवर प्राथमिक उपचार केले. कोल्हापूरच्या या दाम्पत्याचे नाव आहे, डॉ. उदय व नीता संत.
डॉ. संत हे पत्नी डॉ. नीता यांच्यासह त्यांचा कॅनडातील मुलगा निखिल यांच्याकडे निघाले होते. बुधवारी पहाटे दोघे मुंबई-पॅरिस विमानात बसले. विमानाने उड्डाण केल्यानंतर सुमारे चार तासांनी एक अनाउन्समेंट झाली ...एक इमर्जन्सी आहे ! फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर असेल तर ताबडतोब केबिनकडे या. डॉ. संत हे पत्नी नीतासह धावत केबिनकडे गेले. अजूनही एक जण आले होते. एअर होस्टेसने डॉक्टरचे कार्ड मागितले. खात्री केल्यावर डॉ. संत यांना त्यांनी सरळ कॉकपिटमध्येच नेले. विमानाच्या दोन पायलटपैकी एका फ्रेंच पायलटच्या छातीत, पाठीत जोरात दुखत होते.
पायलटच्या सीटवरच डॉक्टरांनी त्याला तपासले. बीपी, पल्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्थित होते. स्टेथोस्कोपने छाती तपासली. पाठीवर मणक्यांच्या डाव्या बाजूच्या स्नायूंवर दाबल्यावर दुखत होते. ते पाहून डॉ. संत यांनी नि:श्वास सोडला. कारण त्या मांसपेशीतील वेदना होत्या. हृदयविकाराचा त्रास नव्हता. अर्ध्या तासाने एअर होस्टेस येऊन डॉक्टर दाम्पत्याचे चारदा आभार मानून गेली.
पायलटला झालेला त्रास हृदयविकाराचा असता तर विमान जवळच्या शहरात उतरवावे लागले असते. विमानाच्या कॉकपिटमध्येच रुग्णावर उपचार करण्याचा अनुभव वेगळाच होता.डॉ. उदय संत, जनरल सर्जन, कोल्हापूर