कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाचे सहमुख्य निवडणूक आयुक्त अनिल वळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली.
या मतदार संघाची मुदत १९ जुलैला संपत आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे मावळते आमदार चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडून आल्यामुळे ही जागा रिक्त आहे. शिक्षक मतदार संघातून सोलापूरचे आमदार दत्ता सावंत हे प्रतिनिधित्व करतात. निवडणूक पुढे गेल्यामुळे इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले आहे.
या दोन्ही मतदार संघांसाठी मागील दोन्ही निवडणुकांचे मतदान २० जून २०१४ रोजी झाले होते; परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने निवडणुकीची प्रक्रिया ठप्प आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत या दोन्ही मतदार संघांची मतदार नोंदणी मात्र सुरूच राहणार आहे. ज्या पदवीधरांनी व शिक्षकांनी आपली मतदार नोंदणी अद्यापही केलेली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून घ्यावी.
ही नोंदणी जिल्ह्यातील कोणत्याही प्रांत तसेच महापालिका कार्यालयात करता येणार आहे. ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपकडून माणिक पाटील-चुयेकर हे इच्छुक आहेत. निवडणुका कधीही झाल्या तरी त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याची तयारी असल्याची माहिती चुयेकर यांनी दिली आहे.पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीकडून सारंग पाटील, अरुण लाड, सुटाचे सुभाष जाधव, भाजपकडून चुयेकर, तसेच प्रवीण कोडोलीकर हे तर शिक्षक मतदार संघातून आमदार दत्ता सावंत यांच्यासह प्रा. जयंत आसगांवकर, भरत रसाळे, दादा लाड, आदी नावे चर्चेत आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर अशी या दोन्ही मतदार संघांची व्याप्ती आहे. या दोन्ही मतदार संघांतील मतदार सुशिक्षित असल्याने मतदार नोंदणीत मात्र तो मागे आहे. त्यास फारच कमी प्रतिसाद मिळत आहे.