कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवार (दि. २५) दुपारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळपासून ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत.
पुणे ते बंगळुरू महामार्गावर किमान चार ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यातील कराडजवळ मांड नदीचे पाणी मालखेड गावाजवळ रस्त्यावर आले होते. ते शनिवारी सकाळी उतरले, पण सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी, पुढे कोल्हापूरजवळ पुलाची शिरोलीजवळ, कागलवेशीवर आयबीपी पंपाजवळ आणि पुढे कर्नाटकातील यमगर्णी येथे रस्त्यावर जास्त पाणी आहे. शनिवार सकाळपासून पावसाने पूर्ण उसंत दिल्याने सायंकाळपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी सुमारे अडीच-तीन फुटांनी कमी झाले होते. पाणी उतरण्याचा वेग जास्त आहे पण महामार्ग सुरळीत होण्यास रविवार दुपार तरी उजाडेल, असा अंदाज आहे..
महामार्ग बंद झाल्यावर लोक पुणे, सातारा, कराड येथे शक्य तिथे थांबले आहेत. दक्षिणेत चेन्नईपर्यंत जाणारे ट्रक ढाब्याजवळ पाहून रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आले आहेत. महामार्ग बंद असूनही वाहने पुढे गेली तर कोल्हापूरच्या वाहनांच्या वेशीवर प्रचंड रांगा लागतात, असा अनुभव यापूर्वी २०१९ च्या महापुरावेळी आला होता. ती चूक यावेळी न करता कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सातारा व सांगली पोलीस अधीक्षकांना कर्नाटकात जाणारे ट्रक जिथे असतील तिथेच रस्त्याकडेला थांबवा, त्यांना पुढे सोडू नका, असे आदेश दिल्याने वाहनांची कोंडी कमी झाली आहे. जिथे गावाजवळ वाहने अडकली आहेत तिथे गावातील लोक त्यांना जेवण, चहा, नाष्ट्याची सोय करत आहेत. २०१९ च्या तुलनेत रस्त्यावरील पाणी दोन दिवसांत उतरण्याची शक्यता असल्याने आजपासून ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.