कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरामध्ये लवकरच मेट्रो रेल्वे स्टेशन सुरू होणार आहे. या स्टेशनला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने रविवारी केली. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना ई-मेलव्दारे पाठविले.
राजर्षी शाहू महाराजांनी देश आणि सर्व समाजाला समतेचा विचार दिला. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आदी क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. पुणे शहरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. या शहराला विद्येचे मंदिर, माहेरघर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्टेशनला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांच्या लोककल्याणकारी कामाला केंद्र, राज्य सरकारने वंदन करावे, अशी मागणी या समितीने केली. समितीच्यावतीने हिंदकेसरी दीनानाथ सिंह, समितीचे निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे, पैलवान अमृता भोसले, भाऊ घोडके, आदींनी मागणी केली.