कोल्हापूर : एकतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे.
आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकरांना मी काय परका नाही. पुणे शहर, कोथरुडमधील गल्ल्यागल्यांमध्ये वर्षानुवर्षे माझी ओळख असणारे, ज्यांच्या घरी अनेकवेळा गेलो आहे, असे अनेक मंडळी आहेत. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगितले.आमदार अमल महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, काही भविष्यातील गणिते केंद्रीय नेतृत्वाच्या मनात असतील, त्यामुळे त्यांनी मला कोथरुडमधून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला.
कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला येथे भाजपला १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. कोणी बंडखोरी करणार नाहीत. जीवंत माणसे असल्याने ती नाराज होणार, रागविणार, बंडखोरीचा अर्ज भरणार पण, ते सर्वजण माघार घेणार. ही निवडणूक महायुती ताकदीने लढणार आहे.
पक्षाचा राज्यअध्यक्ष झाल्यापासून राज्याच्या समन्वयामुळे कोल्हापूरला येणे कमी झाले. पण, माझा मूळ जिल्हा कोल्हापूर असल्याने याठिकाणी आग्रहाने मला लक्ष द्यावे लागणार आहे. या जिल्ह्याचा कार्यकर्ता असल्याने अमल महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी आलो आहे. त्यांचा संपर्क आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर ते गेल्या निवडणुकीपेक्षा जादा मतांनी विजयी होतील. त्यांना देश आणि महाराष्ट्रात सरकारने केलेल्या कामाचा फायदा होईल. कोण, काय ठरवतयं याच्याशी आमचा संबंध नाही.
आमची ताकद आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता इतकी मोठी आहे की, कशाचा परिणाम होणार नाही. विजय ही विजय आहे. अनेकांना असे वाटले की कोल्हापूरमध्ये दहा पैकी आठ जागा शिवसेनेला गेल्या, पण महाराष्ट्रात नागपूरसह किमान सात-आठ जिल्हे असे आहेत की, जिथे शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्यात शिवसेनेला देखील वाईट वाटत नाही, कारण युतीमध्ये असा थोडा न्याय-अन्याय चालतो.
कोल्हापूर जिल्ह्यात जर,सहा विद्यमान आमदार असतील, दोन ज्या नव्हत्या, त्याठिकाणी त्यांनी चांगली लढत दिली असेल, तर मला अवाजवी काही मागता येत नाही. त्यामुळे सेनेला आठ जागा जाणे स्वभाविक होते. जवळच्या सातारा जिल्ह्यात आठ पैकी पाच, सांगलीमध्ये आठ पैकी चार, पुणे येथील आठ पैकी आठ जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिवसेना आणि आम्ही अनावश्यक आग्रह धरला नाही. तसा आमचा स्वभाव नाही. त्यामुळे मला असे वाटते कोल्हापूरमध्ये केवळ दोन जागा आम्हाला मिळाल्या अशी चर्चा करणे योग्य नाही.
कागलसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलाकागलची जागा भाजपला मिळावी यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला. समरजितसिंह घाटगे यांनी खूप मोठी तयारी केली. मात्र, आम्ही सर्वजण चांगले कार्यकर्ते आहोत. जो निर्णय होतो तो आम्ही मान्य करतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.काटा काढण्याबाबत विचारणारआपल्या लोकशाहीमध्ये कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यावेळी मला अजित पवार भेटतील, त्यावेळी मी त्यांना काट्याने काटा काढण्याबाबत विचार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.