कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ जूननंतर अटकेची प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. चारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये वापरलेले पिस्तूल एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.डॉ. दाभोलकर, पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या चारही विचारवंतांच्या खुनात एकाच प्रकारचे पिस्तूल वापरल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे. अॅड. पुनाळेकर व भावे यांना दाभोलकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट केल्याबद्दल सीबीआयने अटक केली आहे. पानसरे हत्येचा तपास करणारे ‘एसआयटी’चे तपास अधिकारी तिरूपती काकडे सीबीआयच्या संपर्कात आहे.
पुणे येथे संशयित पुनाळेकर व भावे यांच्याकडे चौकशी केली आहे. त्यांच्याकडून काही संशयास्पद पुरावे मिळाल्याने सीबीआयची कोठडी संपल्यानंतर एसआयटीने ताबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून १५ जूनपर्यंत अटकेची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येचा तपास न्यायालयाच्या निगराणीखाली सुरू आहे. त्यामुळे तपासाबाबत गोपनीयता ठेवली आहे.
दुचाकीसह शस्त्रांचा पत्ताच नाहीपानसरे हत्येमध्ये वापरलेल्या दोन दुचाकी आणि दोन पिस्तुले यांचा अद्यापही ठावठिकाणा तपास पथकाच्या हाती लागलेला नाही. आतापर्यंत नऊ आरोपींपैकी सात आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये दुचाकीसह पिस्तुले कोठे लपविण्यात आली, याबाबत काहीच माहिती पथकाला मिळालेली नाही. कळसकर याच्या चौकशीमध्ये ही माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. पानसरे हत्येतील फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर, सागर लाखे यांचा अद्यापही ठावठिकाणा मिळालेला नाही.पानसरे हत्येमध्ये १३ आरोपींचा सहभागपानसरे हत्येमध्ये आतापर्यंत नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. ती गुन्हा रजिस्टरवर नोंदही झाली आहेत. आणखी चौघांचा त्यामध्ये सहभाग आहे. १३ संशयितांचा हत्येमध्ये सहभाग असून फरार चौघांना अटक केल्यानंतर हा खटला सुरू होईल, असे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले.डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्यापानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यामध्ये कळसकरचा सहभाग होता, अशी माहिती तपास यंत्रणेतील एका ज्येष्ठ तज्ज्ञाने दिली.