गडहिंग्लज : आंबेओहोळ प्रकल्पस्थळी अंगावर रॉकेल ओतून उपअभियंता दिनेश खट्टे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि बांधकाम सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांवर पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, अमोल नाईक, रोहित बांदिवडेकर यांच्यासह उपअभियंता, शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, २०२०-२१ मध्ये शासनाने आंबेओहोळ प्रकल्पाची घळभरणी व पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी अधिकारी जिवाचे रान करीत आहेत. परंतु, ८० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले असतानाही प्रकल्पग्रस्तांपैकी एक विशिष्ट गट बांधकाम सुरू होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे.
बांधकामाची पाहणी करण्यासाठी ७ डिसेंबरला गेलेल्या खट्टे यांना काम बंद करण्याची धमकी देण्यात आली. स्वत:च्या व त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु, या संदर्भात वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कनिष्ठ अभियंता संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी उमेश मुडबिद्रीकर, अभय हेर्लेकर, पूनम पाटील, सचिन माने उपस्थित होते.
क्रमांक : १११२२०२०-गड-१०