कोल्हापूर : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे भूमिका बजावत आहे. गेल्या तीन वर्षांत या गुन्हेगारांच्या शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०११ ला गुन्हेगारांचा शिक्षेच्या प्रमाणाचा आलेख ८.२ टक्के इतका होता. तो आता १५.४ झाला आहे. त्याचे कारण म्हणजे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या केलेला तपास होय, अशी माहिती आज, शुक्रवारी कोल्हापूर येथे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिली.पोलीस महासंचालक दयाळ कोल्हापुरात एका खटल्यासंदर्भात साक्ष देण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. न्यायालयातील कामकाज आटोपल्यानंतर ताराबाई पार्क येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जवखेड (जि. नगर) येथील दलित हत्याकांड प्रकरणाचा तपास करताना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने, अतिशय सावध गतीने पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्याचबरोबर पोलीस दलाची आणखी प्रशिक्षण केंद्रे उभारली पाहिजेत. त्यामध्ये प्रामुख्याने मूलभूत सुविधा असल्या पाहिजेत. राज्यातील शेतकरी आंदोलनातील खटले मागे घेण्याचा शासन आदेश आलेला नाही; त्यामुळे ते कधी मागे घेतले जातील हे सांगू शकत नाही, असेही दयाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी राज्यातील गुन्हेगारी, पोलीस दलातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलाविली होती. त्यामध्ये पोलीस दलाचे मूलभूत प्रश्न, तसेच पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)
गुन्हेगारांच्या शिक्षेचे प्रमाण वाढले : दयाळ
By admin | Published: November 21, 2014 11:52 PM